ऑपरेशन पोलो व मराठवाडा मुक्तिसंग्राम
ऑपरेशन पोलो
हैदराबाद विलीनीकरणासाठी भारतीय सेनेचे ऑपरेशन पोलो- भारतीय सैन्याची हैदराबादवर चढाई.
निजामाच्या असफिया घराण्याची राजवट १७२४ ते १९४८ पर्यंत सुमारे सव्वा दोनशे वर्षे होती. मीर उस्मान अलीखान बहादूर हे असफिया घराण्याचे सातवे राजे, त्यांची महत्वाकांक्षा मोठी होती.भारतात महत्वाच्या ठिकाणी मुस्लिम सत्तेचे अधिराज्य असावे असे त्यांना वाटत होते.हैदराबाद राज्याचे एकूण १६ जिल्हे होते. त्यात आंध्राचे ८, मराठवाड्याचे ५ व कर्नाटकाचे ३ जिल्हे होते. असे तेलगू, मराठी व कानडी भाषिक नागरिकांचे हैदराबाद संस्थान होते. नागरिकांच्या मातृभाषेला दुय्यम स्थान होते. राज्याची मुख्य भाषा म्हणून उर्दूला स्थान होते. सरकारी माध्यम उर्दू होते. त्यामुळे उर्दू हीच राज्याची भाषा सक्तीची होती. सर्व व्यवहार उर्दू माध्यमाद्वारे होत. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत उर्दू माध्यमाद्वारे शिक्षण घ्यावे लागत असे. हैदराबाद संस्थान हे मुस्लिम राष्ट्र व्हावे म्हणून निजामाने भारतातील अरबी, फारशी भाषेच्या विद्वानांना बोलावून त्यांच्या प्रमुख जागी नियुक्त्या केल्या.
हैदराबाद संस्थान हे देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत संस्थान होते. या संस्थानची ८५ टक्के प्रजा हिंदू व १५ टक्के मुस्लिम जमातीचे नागरिक होते. राजा मुस्लिम असल्याने शासकीय नोकरीतून ८३ टक्के लोक मुस्लिम व ११ टक्के लोक हिंदू व तत्सम लोक शासकीय नोकरीत असत. पण शासनाच्या सर्व खात्यातून अधिकारी वर्ग मुस्लिम असे त्यामुळे हैदराबाद संस्थानातील हिंदूंना केवळ सामान्य जीवन जगावे लागत होते.कोणत्याही धार्मिक कार्यासाठी परवानगी घ्यावी लागे. कोणत्याही ठिकाणच्या मशिदीपुढून कोणत्याही वेळी वाद्य वाजवीत जाता येत नसे. पालखी, दिंडी सारख्या मिरवणुकीवर हल्ले केले जात.
भारतातून ब्रिटिश राज्यकर्ते निघून गेल्यावर इथल्या ज्या संस्थानिकांनी स्वतंत्र भारतात विलीन व्हायला नकार दिला, त्यांत हैदराबादचे निजाम मीर उस्मानअली खान हे अहमहमिकेने होते. पाकिस्तानचे निर्माते बॅ. जीना यांच्या चिथावणीने त्यांनी भारत सरकारला धूप न घालण्याचेच धोरण अवलंबिले होते. याचदरम्यान हैदराबाद संस्थानात कासिम रझवीने इत्तेहाद मुस्लमीन म्हणजेच आजची "एमआयएम" या संघटनेची सूत्रे हाती घेऊन मुस्लिमांना हिंदूंविरुद्ध भडकवण्याचे आणि त्यांची दहशत निर्माण करून लुटालूट, जाळपोळ आणि खूनबाजीचे सत्र आरंभले. निजामी राजवटीतील हिंदू जनतेवरील रझाकारांचे वाढते अत्याचार फार काळ मुकाटपणे पाहणे भारत सरकारला शक्य नव्हते. भारत सरकारलाही आव्हान देण्यापर्यंत त्याची मजल गेली. या पार्स्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन पोलो' अंतर्गत तत्कालीन हैदराबाद राज्य सामिल करून घेतले. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणार्या निजामी लष्कर व रझाकारी टोळ्यांविरुध्द ऑपरेशन कबड्डी चालवले गेले होते. इ.स. १९४८च्या ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात ऑपरेशन पोलोची तयारी सुरु झाली.
हैदराबाद संस्थानात पाच दिशांनी लष्कर शिरले. या कारवाईचे मुख्य संचालक लेफ्टनंट-जनरल महाराज राजेंद्रसिंहजी हे होते, तर मोहिमेचे नेतृत्व लेफ्टनंट जंतीनाथ चौधरी यांच्याकडे होते. वायव्येला औरंगाबादकडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला आदिलाबादकडून, दक्षिणेला कर्नुलकडून तर आग्नेयेला विजयवाड्याकडून लष्कराने संस्थानी हद्दीत प्रवेश केला. १३ सप्टेंबर, इ.स. १९४८ रोजी पहाटे ४ वाजता कारवाई सुरु झाली. पहिल्या तासातच तुळजापूर सर झाले. १४ सप्टेंबरला औरंगाबाद ताब्यात आले व तेथे प्रथमच नभोवाणीवर राष्ट्रगीत म्हटले गेले. त्याचबरोबर दौलताबाद आणि जालनाही मुक्त केले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी सर्वप्रथम जे.एन. चौधरी सैन्यानिशी हैदराबादला पोचले. काळाची पावले ओळखता न आल्याने म्हणा, किंवा ती जाणून घेण्याची इच्छाच नसल्याने म्हणा, निजामाने आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा हेका कायम ठेवला. तशीच वेळ आली तर ब्रिटिश आणि पाकिस्तान आपल्या मदतीला धावून येतील अशी आशा त्यांना वाटत होती. पण ती आशा शेवटी फ़ोलच ठरली, कोणीही मदतीला आले नाही. चहुबाजूंनी होणार्या प्रखर हल्ल्यामुळे निजाम टिकू शकला नाही. निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद संस्थान मुक्त झाले.
भारतातील सर्व संस्थाने विलीन झाली असताना निजामाचे एकमेव हैद्राबाद संस्थान विलीन झाले नव्हते. स्टेट कॉंग्रेसच्या सशस्त्र लढ्याने व भारत शासनाने पोलीस कार्यवाही केल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचे अपूर्ण असलेले पर्व पूर्ण झाले. या लढय़ाला स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखी थोर विभूती सेनानी म्हणून लाभली.
स्वामी रामानंद तीर्थ
Comments
Post a Comment