युगप्रवर्तक छत्रपती शिवराय जयंती विशेष

जगाच्या इतिहासाला अनेक महान व्यक्तीनी आपल्या कार्याने नवे वळण दिले आहे ,पण यातील फार थोड्याच जणांना युगप्रवर्तक वा युगपुरुष या नावाने संबोधले जाते. छत्रपती शिवारायांनी तब्बल चारशे वर्षांपासून परचक्रात असलेल्या एका भूमीला व येथील रयतेला स्वातंत्र्याचा व फक्त स्वातंत्र्यच नव्हे तर स्वराज्याचं स्वप्न दाखवून ते साकार देखील केले. याबाबत सभासद (महाराजांचा समकालीन)म्हणतो ,"राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्‍वरीपर्यंत द्वाही फिरविसी देश काबीज केला. आदिलशाहीस कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही या चारी परकीय पातशाह्या व समुद्रातील बेविस पातशहा फिरंगे असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून हिंदवी स्वराज्य स्थापिले, सिंहासनाधीश छत्रपती जहाले. शककर्ते झाले, ए जातीचा कोणी मागे झाला नाही. पुढेही होणे नाही.'
शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण करून "हे राज्य अठरापगड जातीच्या रयतेचे आहे",
"सर्वांस पोटास लावले आहे" हे देखील सांगितले ,यामुळे महाराज युगप्रवर्तक ठरतात.





मनुष्य जीवन हे अत्यंत कष्टमय व संकटांनी भरलेले आहे,शिवराय देखील त्याला अपवाद नव्हते ,त्यांना तर सामान्य जीवनाच्या पुढे जाऊन अनेकांच्या जीवनाचा उद्धार करायचे योजिले होते. आपल्याकडचे अपुरे सैन्यबळ, त्यांची क्षमता, दऱ्याखोऱ्या डोंगररांगाची भौगोलिक परिस्थिती, मर्यादित अशी लढाईची साधनसामुग्री, मर्यादित आर्थिक बळ ह्या गोष्टी विचारात घेऊन महाराजांनी आपली स्वतंत्र युद्धनीती आखलेली होती. शक्यतो शत्रुला समोरासमोर सामने न जात, रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी अनेक गड किल्ले ताब्यात घेतले.अटी तटीच्या च्या क्षणी महाराजांनी प्रत्यक्ष माघार घेतली व शत्रू गाफील झाल्यावर परत एकदा पुन्हा जोमाने त्यावर मात केली. महाराजांनी अनेक लढाया केल्या परंतु महाराजांच्या कारकिर्दीतील अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाचा घेतलेला समाचार, पन्हाळगडाचा वेढा आणि आग्र्याहून सुटका हे कसोटीचे क्षण होते परंतु अशा प्रसंगावर धैर्याने मात करुन औरंगजेबासारख्या बलाढ्य राजाला वठणीवर आणणारा एकमेव शुरवीर म्हणून अखंड हिंदुस्थानात नावलौकिक मिळविला.

निष्कलंक चारित्र्य
शिवरायांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. स्त्रीयांचा,परधर्माचा,परधर्मग्रंथाचा,परधर्मस्थळांचा आदर ही त्याचीच उदाहरणे.

पण त्याचबरोबर स्वधर्म्,स्वजन्,स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता.मराठी भाषेवरील सांस्कृतिक आक्रमण देखील महाराजांनी "राज्यव्यवहार कोष"चा उपयोग करून परतवून लावले होते. रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या.स्वराज्याची प्रेरणा अनेकांनी घेतली,बुंदेलखंड च्या छत्रसालला त्यांनी त्याच हेतुने मदत केली,त्याचबरोबर गोव्यामधे सक्तीने धर्मांतर करवणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले.
जिवाभावाची माणसे जोडणारे
तरुणांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल; तर त्यांनी जिवाभावाची माणसे जोडायला शिकले पाहिजे.तानाजी मालुसरे,येसाजी कंक,जिवाजी महाले ,शिवा काशिद यांसारखे जीवाला जीव देणारे सवंगडी महाराजांना लाभले.यामुळेच स्वराज्य आकारास आले.
शेतकऱ्यांचा व कष्टकाऱ्यांचा राजा
छत्रपती शिवाजी महाराज हे जसे दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते तसेच अत्यंत सूक्ष्म दृष्टीने राज्यकारभार करणारे प्रजाहितदक्ष राजेही होते. 1673 मध्ये चिपळुणच्या सैन्याधिकारी यांना महाराजांनी लिहीलेले प्रत्र अत्यंत बोलके होते. ‘मोगलाई बरी वाटेल, असे वागू नका’ असे सांगतानाच ‘उंदीर दिव्यातील वात नेईल आणि त्यामुळे आग लागण्याचा संभव आहे,’ शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये अशी सैन्याला सक्त ताकीद असे ."ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवू बघतो "अशी मुजोर अधिकाऱयांना बजावले ,प्रसंगी नात्यागोट्याचा देखील विचार नाही केला.
भीमसेन सक्सेना व झुल्फिकार खान यांसारखे मोगल इतिहास कारही महाराजांच्या उदारतेचे वर्णन करताना म्हणताट ‘शिवाजीचे सैन्य परप्रांतात घुसल्याच्यावेळेही मशिदी, कुराण आणि स्त्रिया सुरक्षित राहिल्या.’
दुरदर्शीपणा
शिवचरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते कि इतिहासात आधी राज्य स्थापन व्हायचे आणि नंतर राज्याची राजमुद्रा तयार केली जायची . पण जगातील शिवरायांचे स्वराज हे एकमेव राज्य आहे जिथे आधी राजमुद्रा तयार केली गेली आणि नंतर राज्य निर्मितीला प्रारंभ करण्यात आला आणि त्याचे संकल्पना तयार केली ती म्हणजे शहाजी राजे यांनी आणि ती अंमलात आणली ती शिवराय यांनीच.

स्फूर्तीचा अखंड स्त्रोत
शिवछत्रपतींचे इतिहासातील स्थान अढळ आहे. ते अत्यंत कर्तृत्वान, असामान्य रणनितीकुशल, जनतेचे ह्रदय जिंकणारा जाणता राजा म्हणून. त्यांची दूरदृष्टी अफाट आणि विलक्षण होती. त्यांचे युद्धतंत्र तर भल्याभल्यांना अचंबित करणारे होते. शिवराय हा एक मंत्र आहे आणि तो आजही साऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो. इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार आणि भविष्यासाठी वाटाड्याचे कामही करतो.
छत्रपती शिवराय कृतीतून जगता आले पाहिजेत. म्हणूनच शिवरायांनी आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत आपण सद्यस्थितीतील संकटांचा सामना केला तर निश्चितपणाने त्यांना पराभूत करु शकतो हिच शिवरायांना खरी मानवंदना ठरेल.

सेवेसी ठायी तत्पर
धीरज चव्हाण
जय जिजाऊ जय शिवराय

Comments

Popular posts from this blog

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

पैठणी साडीचा इतिहास व माहिती

मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया | Chief Minister's Relief Fund, Maharashtra