शनी नस्तनपुरच्या खोजा राजाची अनोखी गढी...!

      नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यात प्रभू रामचंद्र यांनी स्थापन केलेले शनी महाराज देवस्थान श्रीक्षेत्र नस्तनपुर येथे आदिवासी भिल्ल राजा खोजा नाईक याची भुईकोट किल्लेवजा गढी नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. 



          नस्तनपुर परिसरात भिल्ल समाजाची वस्तीत खोजा नाईक शेती करून उदरनिर्वाह करीत असे. तो शनी महाराजांचा भक्त , कोणतेही काम शनी देवतेचे स्मरून तो करी. एके दिवशी शेतात नांगरणी सुरू असता दगडात नांगर अडकताच तो सोन्यासारखा चमकू लागला. काही वेळात तो दगड म्हणजे ' परिस ' असल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा त-हेने तो अल्पावधीतच गर्भ श्रीमंत झाला. पुढे त्याला आपल्याकडे असलेल्या संपत्तीच्या संरक्षणासाठी गढी बांधण्याच त्यानं ठरवलं , गढीच्या पायात एका बुरूजात श्री गणेशाची स्थापना करून त्याने सुंदर गढी उभारली ती ही गढी आज शेवटच्या घटका मोजत आहे. 

       या गढीतनं खोजा राजाला " दिल्लीचा दिवा " पहायचा होता म्हणुन उंचच उंच बुरूज निर्माण करण्याची त्याची ईच्छा होती. 


     इंग्रजांकडुन मुंबई भुसावळ रेल्वे लाईन टाकण्यासाठी सर्वेक्षण काम सुरू होते. त्या कामात खोजा राजाची गढीच्या तटबंदीला तोडावे लागणार होते. त्यामुळे खोजा राजा व इंग्रज यांच्यात मोठा संघर्ष बराज काळ चालला. निर्णायक चर्चेत खोजा राजाने सांगितले की तुम्ही रेल्वे लाईन सरकवा मी मुंबई ते भुसावळ एक लाईन सोन्याची टाकतो दुसरी तुम्ही टाका. यावरून इंग्रजांनी शंका घेऊन याबाबत शोध घेतला व त्याच्याकडे असलेल्या " परिस " बाबत माहिती मिळाली असता इंग्रजांनी त्याला पकडण्यासाठी शिपायी पाठवले पण खोजा राजाने आपल्या बायको व मुला बाळांसह गढीतील विहीरीत उडी मारली. इंग्रजांनी विहीरीत शोध घेतला असता त्यांना काही सापडले नाही. पण विहीरीत मोठे भुयार सापडले. ते १२ खाटांचे सुंब म्हणजे १२ खाटांना विणण्यासाठी जेव्हढा दोर लागतो तेव्हढी लांबी भुयाराची सापडली. 

       

         अशा अनेकानेक गुढ व भाकडकथा या गढी बद्दल व खोजा नाईक या भिल्ल राजाच्या दंतकथा परिसरात आजही चर्चेचा विषय आहे. तसेच राजा खोजा नाईक व क्रांतीवीर खाज्या नाईक हे दोघे एकच की वेगवेगळे आहेत याचा देखील खुलासा होत नाही.


        इतिहास किंवा इतर कुठल्याही ठिकाणी या गढीची नोंद नसल्याची स्थानिकांची मोठी खंत आहे. गढी विषयी असलेल्या अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. या गढीत आज ३०/३५ फुटांचे ११ बुरूज पाहायला मिळतात. सर्व बुरूजांवर बंदुकीतुन मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहे. विशेष म्हणजे या सर्व बुरूजांमध्ये " कोठार " आहेत. यात विशेष सामग्री संग्रहीत केली जात असे. साधारणतः त्रिकोणी आकाराच्या ०९ एकर परिसरात किल्लेवजा गढी अस्तित्वात आहे. तटबंदी मात्र दिसुन येत नाही. दक्षिणेस खंदक आहे. गढीत तीन मोठ्या विहीरी आहे. विहीरीतील पाण्याचे गढीत उत्तम जल व्यवस्थापन केलेले दिसते. १८ व्या शतकातील याचे बांधकाम झाले असावे. आज गढीची खूपच पडझड झाली आहे. आदिवासी भिल्ल राजा खोजा नाईक याची व गढीच्या अजुनही गुढ व काल्पनिक कथांच अमाप पिक पसरलय. त्याच्या " परिस कथा " फारच लोकप्रिय आहेत. 


       अशी ही ऐतिहासिक गढी विषयी अधिकृत कोणतीही माहिती नसल्याची खंत नागरिक बोलुन दाखवतात. मी मिळवलेली माहीतीही ऐकीव स्वरूपातील आहे त्यामुळे तिच्या सत्यतेविषयी खात्री देता येत नाही. अजुनही अनेक कथा प्रचलीत आहेत. असो.... गढी चा संपूर्णपणे व्हिडीओ यु-ट्युब वर आहे तो पहा स्थानिक लोकांनी तो बनवलाय.    

- संजय पाडवी

Comments

Popular posts from this blog

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान पुस्तक (Computer & IT) - धीरज चव्हाण

पैठणी साडीचा इतिहास व माहिती